गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. दिल्ली पाठोपाठ आता गुजरातमधील राजकोट शहरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं ही माहिती दिली आहे.

रविवारी रात्री ८.१३ मिनिटांनी राजकोट शहराला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहिती प्रमाणे राजकोटपासून ११८ किमी दूर वायव्य दिशेला भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सुदैवानं या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्त हानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजकोट, कच्छ व पटन येथील जिल्ह्याधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहिती प्रमाणे २६ जानेवारी २००१ मध्ये गुजरातमध्ये भयंकर भूकंप झाला होता. भूजपासून ८५ दूर केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल होती. या भूकंपात २० हजार लोक मरण पावले होते. तर दीड लाखांहून अधिक लोक जखमी झाले होते.