चीनने गेल्या वर्षी सीमेजवळ सैन्याची मोठ्या प्रमाणात केलेली जमवाजमव आणि जैसे थे परिस्थिती एकतर्फी बदलण्याचे केलेले प्रयत्न यामुळे या भागातील शांतता व स्थैर्य यांचा भंग झाला, असे भारताने गुरुवारी सांगितले.

पूर्व लडाखमधील आपली सैन्य तैनाती ही ‘संबंधित’ देशाच्या कारवायांना प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने केलेली सामान्य ‘संरक्षणविषयक व्यवस्था’ असल्याचे चीनने म्हटल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ही प्रतिक्रिया दिली.

पूर्व लडाखमधील तिढ्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, प्रत्यक्षात चीनच्या गेल्या वर्षीच्या कारवायांमुळेच या भागातील शांतता धोक्यात आली. चीनच्या कृती १९९३ व १९९६ सालच्या करारांसह द्विपक्षीय करारांचा भंग करणाऱ्या आहेत. दोन्ही बाजू प्रत्यक्ष ताबा रेषेचा आदर राखतील आणि या रेषेलगतच्या भागात आपली लष्करी दले कमीतकमी पातळीवर तैनात करतील, असे या करारांद्वारे ठरले होते, मात्र चीनने त्याचे उल्लंघन केले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

 

‘जीएसएल’ येथे दुसऱ्या युद्धनौकातल बांधणीचा प्रारंभ

पणजी : भारतीय नौदलासाठी दुसऱ्या युद्ध नौकातल (कील)  बांधणीचा प्रारंभ नुकताच नौदलाचे उपप्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांच्या हस्ते गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे पार पडला. नौदलाचे आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अनेक वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) येथे दोन प्रगत युद्धनौकांची बांधणी केली जात आहे. त्यातील पहिल्या युद्ध नौकातल बांधणीला २९ जानेवारी २०२१ मध्ये प्रारंभ करण्यात आला. पहिली युद्धनौका २०२६ मध्ये नौदलाला सुपूर्द करण्यात येईल. तर दुसरी त्यानंतर सहा महिन्यांनी सुपूर्द करण्यात येणार आहे.

गोवा शिपयार्डमध्ये बांधण्यात येणाऱ्या युद्धनौका या रशियाबरोबर केलेल्या करारा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वदेशी जहाज बांधणी कार्यक्रमाचा एक भाग आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात या संदर्भात करार झाला होता.

करोना काळातही अनेक अडचणींचा सामना करत शिपयार्डने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे प्रमुख पाहुणे व्हाइस अ‍ॅडमिरल जी अशोक कुमार यांनी कौतुक केले.