नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत हे एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. देशाच्या विकासासंबंधी बोलताना त्यांनी पुर्वेकडील राज्यांमुळे देश मागास राहिल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद होण्याची चिन्हे आहेत.


जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठात अब्दुल गफ्फार खान स्मारक येथे एका व्याख्यानादरम्यान ते बोलत होते. कांत म्हणाले, भारताचे दक्षिण आणि पश्चिम राज्ये वेगाने प्रगती करीत आहेत. मात्र, पूर्व भागातील बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांमुळे आपला देश सामाजिक दृष्ट्या मागास राहिला आहे. दरम्यान, व्यावसायात सोपेपणा आणण्यात आम्ही वेगाने सुधारणा केली आहे. मात्र, मानवी विकास निर्देशांकात आपण अद्याप मागेच आहोत. या निर्देशांकात सध्या आपण १८८ देशांमध्ये १३३व्या स्थानावर आहोत.

बदलत्या भारतासमोरील आव्हाने या विषयावर बोलताना कांत म्हणाले, देशाचे दक्षिण आणि पश्चिमेकडील राज्ये खुपच चांगली कामगिरी करीत असून वेगाने पुढे जात आहेत. दरम्यान, मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी आपल्याला सामाजिक गोष्टींवर गांभीर्याने विचार करावा लागेल. यावर आम्ही आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाद्वारे या गोष्टींवर काम करीत आहोत.