दिल्लीला मेरठशी जोडणाऱ्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (रविवार) झाला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सादरीकरणाद्वारे संपूर्ण एक्स्प्रेस वेची माहिती पंतप्रधानांना दिली. या एक्स्प्रेस वेचे उद्घाटन मोदींनी केले. मोदींनी यादरम्यान ६ किमी पर्यंत रोड शोही केला.

रोड शो सुरू होण्यापूर्वी जेव्हा मोदी आपल्या वाहनातून पुढे जाऊ लागले. तेव्हा अचानक मोदींनी गाडी थांबवली. त्यानंतर त्यांनी गडकरींना आपल्या गाडीत येण्याचे संकेत दिले. गडकरी यांच्याबरोबर मोदींनी रोड शोची सुरूवात केली. यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या संख्येने उपस्थित असलेले लोक मोदींना पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसले. मोदींनी अनेकांचे हात हातात घेऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

दिल्लीतील तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असतानाही मोदींच्या रोड शोला चांगला प्रतिसाद मिळाला. उपस्थितांमधून मोदी-मोदीचा नारा सातत्याने सुरू होता. प्रत्येकजण आपल्या मोबाइलमधून मोदींचे छायाचित्र काढण्यासाठी प्रयत्न करत होता. मोदींचा ताफा अक्षरधाम येथे पोहोचल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. दिल्लीतील रोड शो नंतर मोदी हे हेलिकॉप्टरने बागपतला रवाना झाले. बागपत येथे ते दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे राष्ट्राला समर्पित करतील.