श्रीलंकेतील मानवी हक्क स्थिती दयनीय असल्याचा करण्यात येत असलेला आरोप अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी सपशेल फेटाळला आहे. देशाच्या विकासासाठी स्थिर आणि शक्तिशाली सरकार गरजेचे असून पाश्चिमात्य देश अनभिज्ञतेतून आपल्यावर टीका करीत आहेत, असेही राजपक्षे यांनी नमूद केले आहे.
देशाच्या विकासासाठी स्थिर सरकार आवश्यक आहे. स्थिर सरकार हा देशासाठी शक्तिशाली पाठिंबा असतो. त्यामुळे जोमाने पुढे जाण्यासाठी जनतेच्या पूर्ण पाठिंब्यावरील शक्तिशाली सरकार हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे, असे मत राजपक्षे यांनी चीनच्या दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे.
आमच्याकडे अंगुलीनिर्देश करणे, टीका करणे हे पाश्चिमात्य देशांना सहज शक्य आहे. मात्र त्या देशांना वस्तुस्थितीची जाणीवच नाही, असे खेदाने म्हणावे लागेल, असेही राजपक्षे म्हणाले. एलटीटीईचा सफाया झाल्यानंतरही मानव हक्कांचे उल्लंघन होत असल्याच्या टीकेबद्दल राजपक्षे बोलत होते.