ओडीसामधील क्योंझर तालुक्यातील तालाबायीताराणी गावातील रहिवाशी असणाऱ्या दियातारी नायक यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र या पुरस्कारामुळे त्यांच्यासमोर रोजागाराची समस्या निर्माण झाली आहे. आदिवासी शेतकरी असणाऱ्या नायक यांना इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांना कोणाही काम देण्यास तयार नाहीय. नायक यांच्या प्रतिष्ठेला रोजंदारीची कामे शोभत नाहीत असं स्थानिकांचे म्हणणे असल्याने आता नायक यांच्या कुटुंबियांवर मुंग्यांची अंडी खाऊन जगण्याची वेळ आली आहे.
२०१० ते २०१३ दरम्यान गोनासिका डोंगररांमधून नायक यांनी एकट्याने फावडे आणि पहारीच्या मदतीने तीन किलोमीटरचा कालवा खणून आपल्या गावात पाणी आणले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे गावातील १०० एकर शेतजमीनीला पाणी मिळाले. याच कार्यासाठी त्यांना यंदा समासेवेतील योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १७ मार्च रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नायक यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याऐवजी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर नायक यांना लोकांनी लहानमोठी कामे देणे बंद केले. नायक हे मोठी व्यक्ती झाली असून त्यांना अशा कमांसाठी नेमता येणार नाही असं येथील लोकांना वाटत असल्याने त्यांना काम मिळणे बंद झाले आहे. नायक यांच्या घरची आर्थिक स्थिती इतकी हलाखीची आहे की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंग्यांची अंडी खाऊन दिवस काढावे लागत आहे. ‘पद्मश्री पुरस्काराने मला काहीच फायदा झाला नाही. आधी मला रोजंदारीचे काम मिळायचे. आता लोकं मला तेही काम देत नाहीत कारण ते मला प्रतिष्ठीत व्यक्ती समजतात. आता आम्ही मुंग्यांची अंडी खावून जगत आहोत,’ असं नायक यांनी सांगितले.
नागिणीची पाने आणि आंबापोळी विकून थोडे फार पैसे कमावणाऱ्या नायक यांना आता पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करायचा आहे. या पुरस्काराची माझ्या लेखी काहीच किंमत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘मी आता नागिणीची पाने आणि आंबापोळ्या विकून संसारासाठी लागणारे पैसे मिळवत आहे. माझ्यासाठी या पुरस्काराची किंमत शून्य आहे. मी हा पुरस्कार परत केल्यास मला पुन्हा काम मिळू शकेल. म्हणूनच मला हा पुरस्कार परत करायचा आहे,’ असं नायक यांनी सांगितले.
नायक यांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत नायक यांना देण्यात आलेल्या घराचे काम राज्य सरकारच्या बिजू पक्का घर योजनेअंतर्गत होणार होते. मात्र त्या घराचेही कामही अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे आजही नायक हे त्यांच्या कुटुंबियांबरोबर झोपडीवजा घरात राहतात आणि महिन्याला मिळणाऱ्या ७०० रुपयांच्या पेन्शनवर संसाराचा गाडा रेटत आहेत. आपल्या वडिलांना अनेक आश्वासने देण्यात आली मात्र त्यापैकी कोणतीही पूर्ण करण्यात आली नाहीत असं नायक यांचा मुलगा आलेख यांने सांगितले. ‘माझ्या वडिलांनी खणलेल्या दगडी कालव्याचे काँक्रिटीकरण केले जाईल, असे आश्वासन सरकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र पुढे त्यासंदर्भात काहीच काम झाले नाही. आपल्या गावातील लोकांसाठी या कालव्याच्या माध्यमातून स्वच्छ पिण्याचे पाणी आणण्याचा वडिलांचा विचार आहे. मात्र सरकारी मदत मिळत नसल्याने ते वैतागले आहेत,’ असं आलेख म्हणाला. सरकारी अनस्थेला कंटाळलेल्या नायक यांनी आपले पद्मश्री पदक चक्क गोठ्यामध्ये टांगून ठेवले आहे. क्योंझरचे जिल्हाधिकारी आशिष ठाकरे यांनी याप्रकरणात लक्ष घालणार असून नायक यांच्या अडचणी समजून घेणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी पद्मश्री पुरस्कार परत करु नये अशी विनंतीही त्यांना करणार असल्याचं ठाकरे म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 11:44 am