मित्रांच्या सहवासात माध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत आपल्या कामाच्या टेबलावरच आणि एकटय़ानेच जेवणाऱ्या व्यक्तींच्या उत्पादकतेत बरीच तफावत असते. अशा व्यक्ती इतरांच्या तुलनेत अधिक काम करतात, असा निष्कर्ष जर्मनीतील शास्त्रज्ञांनी काढला आहे.
नेमके संशोधन काय?
अनेक लोकांना काम करताना काही खाण्याची सवय असते, तर काही लोक आपले जेवणही काम करतो त्याच टेबलावर घेतात, तर कार्यालयात काम करताना अनेकांना भोजनासाठी बाहेर उपाहारगृहात किंवा हॉटेलमध्ये जाण्याची सवय असते. अशा सर्व व्यक्तींचा अभ्यास करून सर्वात अधिक काम कोणत्या व्यक्ती करतात यावर बर्लिन येथील हम्बोल्ट विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले. या संशोधनात त्यांना प्रामुख्याने दोन प्रकार आढळले.
*अल्प वेळात आपल्या ‘डेस्क’वरच भोजन घेणारे
*कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबर नजीकच्या उपाहारगृहात जाऊन भोजनाचा आस्वाद घेणारे
निष्कर्ष काय आहेत?
संशोधकांच्या प्रयोगात दोन्ही पद्धतीने भोजन घेणाऱ्या व्यक्तींना गुणात्मक आणि संख्यात्मक पातळीलाही सारखेच जेवण दिले गेले, आणि या दोन्ही व्यक्तींचे निरीक्षण केले असता असे दिसले की, आपल्या ‘डेस्क’वर भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या व्यक्ती या अधिक तत्पर आणि जागरूक असतात. उलट बाहेर जाणाऱ्या व्यक्ती या सुस्तावलेल्या आणि थंड असतात. चेताक्रिया विज्ञानाच्या चाचण्यांनुसारही, बाहेर जेवणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिक्षिप्त क्रिया मंदावल्या असल्याचे आढळले.
यामागील कोडे उलगडायचे बाकी
मित्रांचा सहवास, वेळेच्या मर्यादा नसणे, बाहेरचे आल्हाददायक वातावरण यापैकी नेमक्या कोणत्या घटकाचा प्रभाव पडल्यामुळे असे होते याबाबत ठाम निष्कर्ष काढता आलेला नाही, यावर अजूूनही संशोधन सुरू आहे असे संशोधकांनी स्पष्ट केले. आत्मपरीक्षण करणे आणि चुकांचे तपशीलवार पृथक्करण करणे या आघाडय़ांवर बाहेर भोजन करणाऱ्या व्यक्ती मागे पडल्या, तर स्वतच्या डेस्कवरच जेवणारे कर्मचारी अधिक सर्जनशील असल्याचे आढळले.