24 February 2021

News Flash

करोनानंतर आता इबोला महामारी… ‘या’ देशामध्ये चार जणांचा झाला मृत्यू; सतर्कतेचा इशारा जारी

अनेकांच्या विलगीकरणास सुरुवात करण्यात आलीय

फाइल फोटो (फोटो सौजन्य: एएफपी)

करोना रुग्णांची संख्या जगभरामध्ये पुन्हा वाढू लागली असतानाच आफ्रीकेमधील गिनी देशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गिनीमध्ये पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा इबोला विषाणूचा फैलाव झाला आहे. या इबोलाचा संसर्ग झाल्याने आतापर्यंत येथे चार जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जणांना संसर्ग झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. इबोलाचा वाढता धोका पाहता गिनी देशातील सरकारने इबोला संसर्गाला महामारी घोषित केलं आहे. गोउइके येथील एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमानंतर सात लोकांना डायरिया, उलट्या आणि रक्तस्त्राव होण्याचा त्रास जाणवू लागला. गोउइके लाइबेरिया सीमेजवळच्या भागातील लोकांचे तातडीने विलगीकरण करण्यात आलं. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार संसर्ग झालेल्या व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. मंत्रालयाने इबोलला महामारी जाहीर केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी साथ रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात ती सर्व तयारी गिनी सरकारने केली आहे. देशाचे आरोग्यमंत्री रेमी लामाह यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना इबोलामुळे चार मृत्यू झाल्याने चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे.

गिनीमध्ये सन २०१३-२०१६ दरम्यान इबोला विषाणूचा मोठ्याप्रमाणात फैलाव झाला होता. या विषाणूचा फैलाव झाल्याने आतापर्यंत पश्चिम आफ्रिकेमध्ये ११ हजार ३०० हून अधिक जणांना मृत्यू झालाय. यापैकी सर्वाधिक मृत्यू हे गिनी, लाइबेरिया आणि रियरा लिओनमध्ये झाले आहेत. इबोला झाल्याची शक्यता असणाऱ्या रुग्णांची दोन वेळा चाचणी करण्यात आली आहे. या लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे विलगीकरण करण्याचं काम आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे.

गिनीप्रमाणेच डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशामध्येही इबोलाचा वेगाने संसर्ग होत आहे. मागील सात दिवसांमध्ये पश्चिम किवु प्रांतामध्ये चार जणांना इबोलाचा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक आरोग्यमंत्री यूजीन नाजानू सलिता यांनी या प्रांतात सर्वात आधी सात फेब्रुवारी रोजी इबोलाचा रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली आहे.

काँगोमधील इक्वाटोर प्रांतात सन २०१८ साली इबोलाचा विस्फोट झालेला. या ठिकाणी एकाच वेळी ५४ रुग्ण आढळून आले होते. यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला होता. काँगोच्या पूर्वेकडील प्रांतामध्ये झालेला इबोलाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. काँगोमध्ये इबोलाच्या दोन लसी वापरण्यात येत आहेत. असं असतानाही आतापर्यंत देशात दोन हजार २६० रुग्ण आढळून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2021 1:48 pm

Web Title: ebola outbreak latest news west african nation guinea declares ebola epidemic after four deaths scsg 91
Next Stories
1 गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी करोना पॉझिटिव्ह
2 टर्की काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याच्या तयारीत; पाकिस्तानसोबत भारताविरुद्ध रचला मोठा कट
3 टूलकिट प्रकरण: ‘दिशा’नंतर निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट
Just Now!
X