नायजेरियात इबोला विषाणू पसरला असून आफ्रिकेमधील या सर्वात जास्त लोकसंख्येच्या देशात राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. नायजेरियाच्या अध्यक्षीय कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे, की तेथे इबोलाची लागण झालेले दोन रुग्ण सापडले आहेत.
नायजेरियाचे अध्यक्ष गुडलक जोनाथन यांनी सांगितले, की संबंधित संस्थांनी ताबडतोब इबोला विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमावलीनुसार प्रयत्न करावेत.
नायजेरियाचे आरोग्यमंत्री ओनेबुची चुक्वू यांनी सांगितले की दोन रुग्ण सापडल्याने लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९ झाली आहे. त्यात एक परिचारिका व लागोसमध्ये मरण पावलेल्या लायबेरियन-अमेरिकन माणसाचा समावेश आहे. इबोलाची लागण झालेल्यांचा एका रुग्णालयात पॅट्रिक सॉयर या मरण पावलेल्या रुग्णाशी संपर्क आला होता. सॉयर नंतर लागोसला गेला व विमानतळावरच कोसळला. नंतर पाच दिवसांनी लागोस येथील रुग्णालयात त्याचे निधन झाले. जोनाथन यांनी इबोलाचा मुकाबला करण्यासाठी १.९ अब्ज नायरा म्हणजे ११.७ दशलक्ष डॉलर मदत देण्याचे मान्य केले असून त्यांच्या योजनेत रुग्णांना वेगळे ठेवणे, सीमेवर दक्षता बाळगणे, राष्ट्रीय पातळीवर या धोक्याचा फेरआढावा घेणे या उपायांचा योजनेत समावेश आहे.
 अध्यक्ष जोनाथन गुडलक यांनी सांगितले, की इबोला विषाणू पसरत असल्याच्या चुकीच्या माहितीपासून सावध राहावे. काही वेळा भलत्याच सूचना दिल्या जातात ते टाळावे. योग्य तेच उपचार करावेत. इबोलाच्या औषधोपचारांनी उलट तो रोग उलटतो अशा अफवा उठल्या होत्या त्याकडे लक्ष देऊ नये.