निवडणुकीची निगडित विविध माहिती सेवा मतदारांना पुरवण्याबाबत गुगलशी करार करण्याबाबतचा प्रस्ताव रद्द केला आहे. काँग्रेस, भाजप या पक्षांसह या क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या करार राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा आक्षेप घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेतला आहे.
अमेरिकास्थित गुगलने या आठवडय़ात निवडणूक आयोगापुढे प्रस्तावित कराराबाबत सादरीकरण केले होते. यावर मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत आणि इतर आयुक्तांनी चर्चा केली. सुरक्षेबाबतचे आक्षेप ध्यानात घेता गुगलशी करार करण्याचा निर्णय रद्द केला, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गुगलला याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. एखाद्या परदेशी कंपनीला महत्त्वाचा मजकूर देण्याबाबत संगणकतज्ज्ञांनी शंका उपस्थित केल्या होत्या. भारतीयांचे गोपनीय दस्ताऐवज अमेरिकन गुप्तचर खात्याच्या हाती लागल्याचे स्नोडेनने उघड केले होते. त्या पाश्र्वभूमीवर हे आक्षेप घेण्यात आले होते. सर्वपक्षीय बैठक बोलावल्या खेरीज आयोगाने असा निर्णय घेऊ नये अशी मागणी प्रमुख राजकीय पक्षांनी केली होती.