पाच टप्प्यांत मतदान; ८ नोव्हेंबरला मतमोजणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांची प्रतिष्ठा पणाला लागणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर झाले. या निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पाच टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतमोजणी ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने पुढील दोन महिन्यांत होणाऱ्या उत्सव काळातील १४ शासकीय सुटय़ांना पर्याय निवडत बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी १२, १६, २८ ऑक्टोबर आणि १ व ५ नोव्हेंबर अशा पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. विद्यमान विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत लक्षणीय यश मिळाल्यानंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला आम आदमी पार्टीने (आप) चांगलाच हादरा दिला. त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जद(यू) आणि राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या आघाडीतील लढतीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच बिहारसाठी १.६५ लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. जवळपास दोन दशके असलेले नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांची सद्दी संपुष्टात आणण्यासाठी हे पॅकेज जाहीर केल्याची चर्चा आहे.
बिहारमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जुन्या जनता परिवारातील नेत्यांनी एकत्रित येऊन महाआघाडी स्थापन केली होती. मात्र अल्पावधीतच या महाआघाडीला सुरुंग लागला. जागावाटपावरून सपाचे नेते मुलायमसिंह या महाआघाडीतून बाहेर पडले आणि जनता परिवारात फूट पडली. आता नितीशकुमार यांच्यासमवेत लालूप्रसाद यादव यांचा राजद आणि काँग्रेस हे महत्त्वाचे पक्ष आहेत. बिहारमध्ये भाजप आणि सत्तारूढ जद(यू) यांच्यातील आघाडी आठ वर्षांनी तुटली.

दसरा, दिवाळी, ईद, मोहर्रम, छटपूजा हे सण निवडणुकीच्या कालावधीत येत असले तरी जातीय सलोखा अबाधित राखला जाईल याची काळजी आयोग घेईल. यासाठी पुरेशी सुरक्षा तैनात केली जाईल. – नसीम झैदी, मुख्य निवडणूक आयुक्त
जागा : २४३
टप्पे : १२, १६, २८ ऑक्टोबर आणि १ व ५ नोव्हेंबर
निकाल : ८ नोव्हेंबर

जागा : २४३
टप्पे : १२, १६, २८ ऑक्टोबर आणि १ व ५ नोव्हेंबर
निकाल : ८ नोव्हेंबर