गुजरात राज्याच्या पर्यटन विभागातर्फे राबविण्यात येणा-या ‘खुशबू गुजरात की’ या जाहिरातीमध्ये काम करणे तूर्तास थांबविण्याचे आदेश गुजरात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडून अमिताभ बच्चन यांना देण्यात आले आहेत. गुजरात राज्याच्या ‘खुशबू गुजरात की’ या मोहिमेसाठी अमिताभ बच्चन यांची राज्याचे सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. गुजरातच्या वडोदरामधील काँग्रेस पक्षातर्फे या जाहिरात मोहिमेतील अमिताभ बच्चन यांच्या सहभागावर घेण्यात आलेल्या आक्षेपानंतर गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिका-यांनी हे आदेश दिले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीकडून गुजरातमधील विकासकामांचा प्रचार केला जाऊ शकतो असा आक्षेप काँग्रेसकडून घेण्यात आला होता. यासंदर्भात नवी दिल्लीमधील निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयातून निर्णय येईपर्यंत अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचे चित्रीकरण करणे थांबवावे असे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० ते १२ मार्चदरम्यान गुजरातमधील वडोदरा, पवागढ आणि चंपानेर या शहरांमध्ये ‘खुशबू गुजरात की’ या जाहिरातीचे चित्रीकरण करण्यात येणार होते.