भाजपाच्या महिला नेत्याला कथितरित्या ‘आयटम’ असं संबोधल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं बुधवारी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना नोटीस बजावली आहे. तसेच पुढील ४८ तासांत या नोटीशीला उत्तर देण्याचे आदेशही दिले.

कलमनाथ यांच्या शेरेबाजीवर आक्षेप घेत निवडणूक आयोगानं नोटिशीत म्हटलं की, मध्य प्रदेशमध्ये ज्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे तिथं आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन करीत कोणत्याही पक्षाकडून कोणत्याही जाती आणि समाजाबद्दल द्वेष, तणाव निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करता कामा नाही.

दरम्यान, रविवारी पोट निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ग्वाल्हेरच्या डब्रा टाउन येथून उभ्या असलेल्या भाजपाच्या उमेदवार इमरती देवी यांच्यावर कमलनाथ यांनी टिपण्णी करताना काँग्रेसचा उमेदवार हा साधा माणूस आहे तर त्यांच्या विरोधातील उमेदवार ‘आयटम’ आहे, असं म्हटलं होतं. कमलनाथ यांच्या शेरेबाजीनंतर भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाने निषेध आंदोलनही केले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील मंगळवारी कमलनाथ यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करीत हे दुर्देवी असल्याचं म्हटलं होतं.

तसेच राष्ट्रीय महिला आयोगानंही कमलनाथ यांना महिलेबाबतच्या आक्षेपार्ह विधानाबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. तसेच शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून कमलनाथ यांचा निषेध करीत त्यांना पक्षातील सर्व पदांवरुन दूर करण्याची मागणी केली होती.

दरम्यान, कमलनाथ यांनी आपल्या या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करीत आपण यादीतील क्रमांकाबाबत बोलताना ‘आयटम’ असा शब्द वापरल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यामुळे आपण महिलांचा अनादर करणारं वक्तव्य केलं नसल्याचं सांगत माफी मागण्यास नकार दिला.