दिल्लीत विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू असताना १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांचे वाढीव साह्य़ केंद्र सरकारने जाहीर केल्याबद्दल निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस पाठविली आहे. ३ नोव्हेंबपर्यंत उत्तर देण्याची मुदतही आयोगाने घातली आहे.
दिल्ली विधानसभेच्या कृष्णनगर, मेहरौली आणि तुघलकाबाद या तीन मतदारसंघांत २५ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांतील आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या निवडणुका होत आहेत.
शीख अंगरक्षकांनी १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या केल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलींत ३,३२५ नागरिक मृत्युमुखी पडले होते. त्यातील २,७३३ दिल्लीतच दगावले होते. अन्य मृत्यू हे उत्तर प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ओढवले होते. या सर्व दंगलग्रस्तांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत मिळालेल्या सानुग्रह अनुदानाव्यतिरिक्त प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणा गृह मंत्रालयाने गुरुवारी केली होती.
‘निवारालये उभारा, अन्यथा परिणामांना सामोरे जा’
नवी दिल्ली : हिवाळ्याचा मोसम जवळ येत असल्याने बेघरांसाठी पुरेशी निवारालये बांधावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश राज्य सरकारांना दिला. हिवाळ्यापूर्वी ही निवारालये बांधून पूर्ण न झाल्यास त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दिला. निवारालये तयार झाली नाहीत तर आम्हाला अत्यंत कठोर व्हावे लागेल, असेही पीठाने म्हटले आहे.