संयूक्त जनता दलाचे (जदयू) बंडखोर नेते शरद यादव यांना निवडणूक आयोगाने मोठा झटका दिला आहे. आपलाच जदयू पक्ष खरा असल्याचा शरद यादव यांनी केलेला दावा निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील जदयूच खरा पक्ष असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

यादव यांनी यासाठी पुरेसे पुरावे दिले नसल्याचे आयोगाने हा अर्ज फेटाळताना म्हटले आहे. शरद यादव आणि अली अन्वर अन्सारी यांच्या पक्षविरोधी कारवाईमुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जदयूने केली होती. त्यामुळे मंगळवारी राज्यसभा सचिवालयाने यादव आणि अन्सारी यांना याप्रकरणी एका आठवड्याच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.

जदयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी भाजपशी हात मिळवणी केल्यानंतर शरद यादव यांनी पाटणा येथे विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या मोर्चात भाग घेतला होता. त्यानंतर जदयूने राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे या दोघांनाही निलंबित करण्याची मागणी केली होती. यादव यांच्याबरोबर अन्सारी यांनीही राष्ट्रीय जनता दलाच्या या मोर्चात सहभाग नोंदवला होता.