केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते जॉय बॅनर्जी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निवडणूक आयोग भाजपला नोटीस बजावणार आहे. बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वरमधील सभेत केलेल्या भाषणात जॉय बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचे निवडणूक आयोगावर नियंत्रण असल्याचे म्हटले होते. त्यामुळे पश्चिम बंगालमधील निवडणुकीवेळी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी सभेमध्ये दिले होते. त्यांच्या याच विधानावरून निवडणूक आयोग भाजपला नोटीस बजावणार आहे.
बिहारमधील निवडणुकीत भाजपने यश मिळवले, तर पुढील पश्चिम बंगालमधील निवडणुकीत पक्ष एकतर्फी विजय मिळवेल, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते. जॉय बॅनर्जी यांच्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर पक्षाने या वक्तव्याचा निषेधही केला आहे. मात्र, जॉय बॅनर्जी यांच्या विधानामुळे लोकांच्या मनातील निवडणूक आयोगाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळेच आयोगाने नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला.
निष्पक्षपातीपणा हे निवडणूक आयोगाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही स्थितीत त्याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भाजपला नोटीस बजावल्यामुळे इतर पक्षांनाही योग्य तो इशारा मिळेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.