देशभरात बुधवारी बकरी ईद साजरी केला जाणार आहे. बकरी ईदला बकऱ्यांचा बळी दिला जातो. मात्र लखनऊत काही मुस्लिमांनी इको-फ्रेंडली बकरी ईद साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी बकऱ्याच्या जागी केक कापले जाणार आहेत. विशेष म्हणजे केकवर बकऱ्याचा फोटो असणार आहे.

लखनऊमधील एका बेकरीत हे केक विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. केक खरेदी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार, ‘बकरी ईदला बकऱ्यांचा बळी देण्याची प्रथा योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की त्यांनी बकरी ईदला जनावराचा बळी न देता केक कापून साजरी करावी’.

याआधी शिया मौलवी मौलाना सैफ अब्बास यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं निधन झाल्याने बकरी ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. नमाज पठण करा, बकऱ्यांचा बळी द्या मात्र शांततेत करा असं त्यांनी सांगितलं होतं.

याआधी काही प्रमुख मुस्लिम संघटनांनी बकरी ईदला गाय किंवा बैलाचा बळी न देण्याचं आवाहन केलं होतं. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्‍यक्ष मौलाना राबे हसनी नदवी, जमात-ए-इस्‍लामीचे अध्‍यक्ष मौलाना जलालुद्दीन उमरी आणि इस्‍लामि‍क सेंटर ऑफ इंडियाचे अध्‍यक्ष मौलाना खालिद रशीद यांनी मुस्लिमांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बकरी ईदला गोवंशाची हत्या करु नका असं आवाहन केलं आहे.