17 January 2021

News Flash

अर्थव्यवस्थेची अधोगती, विकासदर उणे २३.९ टक्के

अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटकांपैकी, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राची सरलेल्या तिमाहीत अत्यंत दारुण स्थिती दिसून आली

(संग्रहित छायाचित्र)

आधीच संथगतीने वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेला करोनाचा मोठा फटका बसला. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट केले.

तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही आहे. अर्थविश्लेषकांनी वर्तविलेल्या पूर्वअंदाजांपेक्षा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेची अधोगती मोठी असल्याचे ही आकडेवारी दर्शविते. ही चिंतेची बाब मानली जाते. त्यामुळे यातून बाहेर पडण्यालाही वेळ लागेल या भीतीने भांडवली बाजारातही सोमवारच्या व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांमध्ये मोठी घसरगुंडी दिसून आली.

अपेक्षा केली जात होती त्याप्रमाणे, केवळ कृषी क्षेत्रात एप्रिल-जून तिमाहीत सकारात्मक वाढ राहिली, असे राष्ट्रीय सांख्यिकी विभागाची (एनएसओ) आकडेवारी दर्शविते. मात्र अर्थव्यवस्थेच्या उत्पादन, बांधकाम आणि सेवा क्षेत्र या इतर अंगांमध्ये कमालीचा उतार दिसला आहे. करोना प्रतिबंध म्हणून २५ मार्च २०२० पासून सुरू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीने व्यापार-उदिमासह, सामान्य जनजीवनावर साधलेल्या विपरीत परिणामाचेच प्रतिबिंब अर्थव्यवस्थेतील या भीषण उतारात प्रतिबिंबित झाले आहे, अशी ‘एनएसओ’ची स्पष्टोक्ती आहे.

देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन (२०११-१२ च्या स्थिर किमतीनुसार) २०२०-२१ आर्थिक वर्षांच्या प्रथम तिमाहीत २६.९० लाख कोटी रुपये अंदाजण्यात आले आहे, जे २०१९-२० च्या प्रथम तिमाहीत ३५.३५ लाख कोटी रुपये होते. म्हणजे २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत दिसलेल्या ५.२ टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत ते २३.९ टक्क्यांनी आकुंचन पावले आहे, असे ‘एनएसओ’ने दिलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.

करोनाच्या प्रादुर्भावापूर्वीही म्हणजे जानेवारी ते मार्च २०२० तिमाहीत अर्थव्यवस्थावाढीचा दर हा आठ वर्षांच्या नीचांकाला म्हणजे ३.१ टक्के नोंदविला गेला होता, तर मागील वर्षांत एप्रिल ते जून २०१९ तिमाहीत जीडीपीवाढीचा दर ५.२ टक्के असा होता.

अर्थव्यवस्थेच्या प्रमुख घटकांपैकी, उत्पादन आणि बांधकाम क्षेत्राची सरलेल्या तिमाहीत अत्यंत दारुण स्थिती दिसून आली. बांधकाम क्षेत्रातून सकल मूल्यवर्धनाचे प्रमाण तिमाहीत उणे ५०.३ टक्के इतक्या गंभीर स्वरूपात आक्रसले, जो मागील वर्षी याच तिमाहीत ५.२ टक्के होता. उत्पादन क्षेत्राबाबत हेच प्रमाण उणे ३९.३ टक्के इतके आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हे क्षेत्र ३ टक्के दराने वाढ करीत होते. खाणकाम क्षेत्रही २३.३ टक्क्यांच्या घरात आक्रसले आहे. आतिथ्य, वाहतूक, दळणवळण, व्यापार या सेवांमध्ये तिमाहीत ४७ टक्क्यांचा उतार दिसून आला आहे. वीज, वायू, पाणीपुरवठा आणि अन्य सेवांचे अर्थव्यवस्थेतील मूल्यवर्धन गतवर्षी याच तिमाहीत ८.८ टक्के वाढले होते, ते यंदाच्या तिमाहीत ७ टक्के घट दर्शविणारे आहे.

बाजाराचा थरकाप; सेन्सेक्सची ८३९ अंशांनी गटांगळी

मुंबई : भारत-चीन सीमेवर पुन्हा युद्धसदृश वाढलेला ताण आणि देशाच्या आर्थिक विकासदरातील दारुण आकुंचन दर्शविणाऱ्या आकडेवारीबाबत सावधगिरीतून भांडवली बाजारात निरंतर सुरू असलेल्या निर्देशांक दौडीला सोमवारी लगाम बसला. प्रमुख निर्देशांकांनी मोठी गटांगळी घेतली. उल्लेखनीय म्हणजे प्रारंभीच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ने ४०,००० चा टप्पा गाठणारी मजल मारली होती; परंतु त्या उच्चांकावरून तब्बल १६०० अंश खाली म्हणजे ३८,६२८.२९ म्हणजे ८३९.०२ अंशांच्या नुकसानीसह सेन्सेक्सने दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला. निफ्टी निर्देशांकही २६०.१० अंशांच्या घसरणीसह ११,३८७.५० या पातळीवर दिवसअखेरीस विसावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 12:17 am

Web Title: economic downturn growth rate minus 23 9 per cent abn 97
Next Stories
1 चीनचा पूर्व लडाखमध्ये पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न
2 माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन
3 ‘..त्या डॉक्टरांना सशस्त्र दलातील शहिदांचा दर्जा द्यावा’
Just Now!
X