नवी दिल्ली : रिझव्‍‌र्ह बँकेच्या धोरणांना संशोधनाची जोड देऊन भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देण्यात मोलाचा वाटा असलेले अर्थतज्ज्ञ दीना खटखटे यांचे अमेरिकेत वॉशिंग्टन येथे निधन झाले. खटखटे यांनी १९५५ ते १९६८ या काळात रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे धोरण सल्लागार व संशोधक-संचालक म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. त्याचवेळी त्यांच्यातले गुण हेरून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांना संधी दिली. तेथे त्यांनी सहायक संचालकपदासह अनेक उच्चपदांवर २० वर्षे काम केले. काही मुद्दय़ांवरून नाणेनिधीशी मतभेद झाल्याने ते तेथून बाहेर पडले. त्यानंतर ते ‘वर्ल्ड डेव्हलपमेंट’ या संशोधनविषयक नियतकालिकाचे संपादक झाले. त्यांनी अर्थशास्त्रातील संशोधनावर अधिक भर दिला. ‘पत अर्थशास्त्र’ हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. समाजवाद, केंद्रीय नियोजन, केनेशियन स्थूल अर्थशास्त्र यावर त्यांनी चाकोरीबाहेरचे विचार मांडताना भांडवलशाही व बाजारपेठ व्यवस्थेच्या समर्थनाबाबत विकसनशील व प्रगत देशातील आर्थिक संबंधांवर सकारात्मक दृष्टिकोन मांडला. ब्रेन ड्रेनचे त्यांनी अपेक्षित सामाजिक गुंतवणूक म्हणून समर्थन केले होते. खटखटे यांनी संयुक्त राष्ट्रातही वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले. त्यांची ‘मनी अँड फायनान्स- इश्यूज, इन्स्टिटय़ुशन्स, पॉलिसी’, ‘रूमी नेशन्स ऑफ गॅडफ्लाय’ ही पुस्तके विशेष गाजली.