पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य सुरजीत भल्ला यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी राजीनामा दिला. आता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुरजीत यांच्या राजीनाम्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून सुरजीत यांनी राजीनाम्याची माहिती दिली.

उर्जित पटेल यांच्यापाठोपाठ सुरजीत भल्ला यांच्या राजीनाम्यामुळे मोदी सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. आर्थिक व राजकीय वर्तुळात या या राजीनाम्यांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. मोदी सरकारने सप्टेंबर २०१७ मध्ये या आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. नीती आयोगाचे सदस्य डॉ. विवेक देबरॉय हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. आर्थिक विषय तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य विषयांबाबत सरकारला विशेषत: पंतप्रधानांना सल्ला देण्याची जबाबदारी या परिषदेवर असते. ही परिषद स्वायत्तरित्या काम करते.

गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयातील उच्चपदस्थांमध्ये सातत्याने खटके उडत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय आर्थिक निर्णय घेण्याच्या नादात सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.