माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सोमवारी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवला. असक्षम डॉक्टारांकडून उपचार घेणारा रुग्ण, अतिदक्षता विभागात ढकलले जाण्याची वाट पाहत आहे. अशा शब्दात चिदंबरम यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे वर्णन केले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात राज्यसभेत ते बोलत होते.

चिदंबरम म्हणाले,  मी म्हणेल अर्थव्यवस्था आयसीयूत नाही, परंतु आयसीयूत ढकलले जाण्याची वाट पाहत आहे. ती अजूनही आयसीयूच्या बाहेरच आहे व असक्षम डॉक्टर तिच्यावर उपचार करत आहे. तसेच, रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी दिलेल्या इशाऱ्याचा दाखला देत त्यांनी म्हटले की , तुम्ही रघुराम राजन आणि अरविंद सुब्रमण्यम कसे सोडून जातील हे पाहिले, एवढंच नाहीतर अरविंद पणगरीया हे देखील जास्त काळ राहिले नाही. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांपासून मुक्त करण्याची गरज आहे, परंतु तुमचे डॉक्टर कोण आहेत?असा सवालही त्यांनी केला. नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांनी देखील सांगितले की, अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. तर, केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना लक्ष्य करणे सुरू केले, असेही चिदंबरम म्हणाले.

यावेळी त्यांनी  भाजपाच्या सबका साथ सबका विकास या घोषणेचा समाचार घेतला. एखाद्या रुग्ण दगावला तर त्याच्या बाजुला उभं राहून सबका साथ सबका विकासाच भजन म्हणण्यात काही अर्थ आहे का?  सरकार नकारात्मक जगात जगत आहे. आपल्या चुका मान्य करण्यासही तयार नसल्याचा त्यांनी यावेळी आरोप केला.  याचबरोबर, आपली अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असून तिच्यावर सक्षम डॉक्टरांनी उपचार करण्याची आवश्यकता आहे.  अर्थव्यवस्था कोसळत असल्याचे वास्तव नाकारले जात आहे.  तसे करत असताना वाढती बेरोजगारी व आर्थिक घसरण या दोन मुद्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.