आर्थिक आघाडीवर शुभवर्तमान हाती आले असून सेवा क्षेत्र, उत्पादन, खाणकाम क्षेत्रातील कामगिरीमुळे एप्रिल ते जून या तिमाहीत देशाने गेल्या अडीच वर्षांत प्रथमच सर्वाधिक म्हणजे ५.७ टक्के इतका आर्थिक वाढीचा दर गाठला आहे. केंद्रीय सांख्यिकी संस्थेने दिलेल्या माहितीनुसार उत्पादन क्षेत्राने २०१४-१५ मध्ये पहिल्या तिमाहीत ३.५ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे.
२०१३-१४ मध्ये वाढीऐवजी १.२ टक्के इतका संकोच झाला होता. खाणकाम क्षेत्रात एप्रिल ते जून या काळात २.१ टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच काळात ३.९ टक्के इतकी उत्पादन कपात झाली होती. आर्थिक सेवा क्षेत्रात २०१४-१५ या वर्षांतील पहिल्या तिमाहीत १०.४ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली. वीज, वायू व पाणी पुरवठय़ात १०.२ टक्के वाढ झाली आहे. २०११-१२ मध्ये ऑक्टोबर-डिसेंबर या काळात एकूण राष्ट्रीत उत्पादन वाढीचा दर ६ टक्के होता व नंतर जानेवारी ते मार्च या काळात तो ४.६ टक्के झाला. बांधकाम क्षेत्रात पहिल्या तिमाहीत वर्षांपूर्वी १.१ टक्के वाढ झाली होती ती आता ४.८ टक्के आहे.
व्यापार, हॉटेल्स, वाहतूक व दळणवळण या क्षेत्रात पहिल्या तिमाहीत २.८ टक्के वाढ नोंदवली गेली. २०१३-१४ मध्ये ही वाढ १.६ टक्के होती. कृषी क्षेत्रात वर्षांपूर्वी ४ टक्के वाढ झाली ती आता ३.८ टक्के म्हणजे कमी झाली आहे. एकूण स्थिर भांडवल निर्मिती म्हणजे गुंतवणुकीचा निदर्शक असलेल्या घटकात वाढ झाली आहे. हे भांडवल वर्षांपूर्वी ७.३२ लाख कोटी होते ते आता पहिल्या तिमाहीत ८.१४ कोटी रुपये झाले आहे.