माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सध्या अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस अत्यंत खराब होत आहे. मात्र भयानक गोष्ट ही आहे की सरकारला या गोष्टीची जरा देखील जाणीव नाही. सध्या आपण आर्थिक मंदीचा सामना करत आहोत, अर्थव्यवस्था आणखी ढासळत आहे त्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी मोदी सरकारला दिला.

यावेळी मनमोहन सिंग यांनी सांगितले की, देशाच्या विकास दरात घसरण होऊन तो केवळ पाच टक्केच राहिला आहे. हे पाहून आम्हाला २००८ मधील आठवण होत आहे, तेव्हा आमचे सरकार होते आणि अर्थव्यवस्था एकमद कोलमडली होती. त्यावेळी अर्थव्यवस्थेतील झालेली घसरण ही आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटामुळे झाली होती. त्यावेळी आमच्यासमोर आव्हानात्मक परिस्थिती होती. आमच्यासमोर असलेल्या या आव्हानानला आम्ही संधीच्या रूपात पाहिले व अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याच्या दिशेने पावलं उचलली.

आज देखील आपण तशाच काहीशा परिस्थितीला सामोरे जात आहोत, मग ते रियल इस्टेट बाबत असो किंवा कृषी क्षेत्राबाबत प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या घसरणीमुळे अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिकच खालावत आहे. जर या परिस्थितीतून बाहेर काढले गेले नाही तर रोजागार क्षेत्रात सर्वात वाईट परिस्थिती निर्माण होईल. जर दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत गेली तर अर्थव्यवस्थेसमोरी अडचणींमध्ये अधिकच भर पडेल, असा सूचक इशाराही त्यांनी सराकारला दिला आहे.

अर्थव्यवस्थेच्या घसरणीवरून काँग्रसकडून सातत्याने केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. या अगोदर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेतील मंदीवरून मोदी सरकारला टीकास्र सोडले होते.