सकल राष्ट्रीय उत्पादन ७.१ टक्के, वार्षिक तुलनेत जुलै-ऑक्टोबरमध्ये वाढीव कामगिरी

इंधनाच्या वाढत्या किमती, अमेरिकी चलनापुढील रुपयाची नांगी तसेच उत्पादनाला ग्रामीण भागांत असलेली कमी मागणी याचा फटका देशाच्या विकासाला बसला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन ७.१ टक्के नोंदले गेले असून ते गेल्या सलग तीन तिमाहीच्या तळात आहे.

केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेला देशाच्या विकासाचा हा दर वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील ६.३ टक्क्यांच्या तुलनेत काहीसा उंचावणारा असला तरी आधीच्या तिमाहीतील ८.१ टक्क्यांपेक्षा किती तरी कमी आहे. यापूर्वीची विकास दरातील घसरण नोटाबंदीच्या निर्णयानंतर नोंदवली गेली होती. देशाचा सध्याचा विकास दर हा शेजारच्या चीनच्या ६.५ टक्क्यांच्या तुलनेत अधिक असून भारताचा विद्यमान प्रवास जगातील अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगवान राहिला आहे.

सकल राष्ट्रीय उत्पादनाचे ताजे आकडे काहीसे निराशाजनक आहेत. मात्र चालू वित्त वर्षांतील आतापर्यंतच्या कालावधीतील विकास दर निश्चितच उत्साहवर्धक आहे. दुसऱ्या तिमाहीत निर्मिती तसेच कृषी वाढ स्थिर राहिली आहे. मात्र कमी मान्सूनमुळे बांधकाम, खनिकर्म क्षेत्रात घसरण झाल्याचे जाणवते.      – सुभाषचंद्र गर्ग, केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव