माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या मित्रांच्या अनेक व्यावसायिक आस्थापनांवर प्राप्तिकर व सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी छापे टाकले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बराच काळ हे छापे सुरू होते. ते नेमके कुठल्या ठिकाणी टाकण्यात आले याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. आज तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले. खासगी नेत्र चिकित्सा समूहासह काही कंपन्यांवर छापे टाकले असून त्यात कार्ती चिदंबरम यांचे समभाग आहेत व दोन संस्थांनी त्या कंपन्यांवर छापे टाकण्याचे काम केले.
या आस्थापनांनी प्राप्तिकर चुकवल्याने प्राप्तिकर खात्याने कारवाई केली तर परदेशी चलन व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याने सक्तवसुली संचालनालयाने कारवाई केली. वारंवार प्रयत्न करूनही कार्ति चिदंबरम प्रतिक्रियेस उपलब्ध होऊ शकले नाहीत. ऑगस्टमध्ये कार्ती यांच्याशी संबंधित दोन आस्थापनांच्या संचालकांना सक्तवसुली संचालनालयाने समन्स पाठवले होते. एअर सेल टेलेव्हेन्चर या आस्थापनेला २६ लाख रूपये या आस्थापनांकडून देण्यात आले होते. एअरसेल व मॅक्सिस व्यवहाराचीही सीबीआय व सक्तवसुली संस्थेने चौकशी केली आहे.

द्वेषमूलक कृती- पी.चिदंबरम
दरम्यान, माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी सांगितले की, सरकारने द्वेषमूलक हेतूने आपल्या कुटुंबीयांची गळचेपी सुरू केली आहे. जर मला किंवा मुलाला लक्ष्य करायचे होते तर थेट तसे न करता मुलाच्या मित्रांना छळण्याची गरज नव्हती. कारण त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही. माझे कुटुंबीय व मी सरकारच्या द्वेषमूलक कृत्यांना तोंड देण्यास तयार आहोत. प्रवासात असताना आपल्याला या छाप्यांबाबत कळले. ज्या आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले त्यात माझे व कुटुंबीयांचे समभाग नाहीत, असे सांगून ते म्हणाले की, त्या व्यावसायिक कंपन्या असून सरकार विचारेल त्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहेत. त्या आस्थापनांचा संबंध माझ्या मुलाशी जोडून केलेल्या कारवाईचा मी निषेध करतो.