आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अवंथा ग्रुपचे प्रमोटर गौतम थापर यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ईडीकडून गौतम थापर यांच्यासहित त्यांचा सहभाग असणाऱ्या व्यावसायांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. यानंतर गौतम थापर यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

गौतम थापर यांना आज न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे जिथे ईडीकडून कोठडीची मागणी केली जाऊ शकते. ईडीकडून गौतम थापर यांच्या अवंथा कंपनी, येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आणि त्यांच्या पत्नीमध्ये झालेल्या कथित व्यवहाराची चौकशी केली जात आहे. राणा कपूर आणि त्यांच्या पत्नी आधीपासूनच ईडीच्या रडारवर आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरनंतर ईडीकडून मनी लाँण्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

येस बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने जून महिन्यात १७ ठिकाणी छापेमारी केली होती. दिल्ली एनसीआरसह तीन राज्यातं सीबीआयनं छापेमारी केली होती. ४६६ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गौतम थापर यांच्याविरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल करण्यात आला होता.

सीबीआयच्या आरोपांनुसार, येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ असणाऱ्या राणा कपूर यांनी अवंथा ग्रुपची मालकी असणाऱ्या दिल्लीमध्ये मोक्याच्या ठिकाणी बाजारभावापेक्षा कमी किंमतीत संपत्ती विकत घेतली होती. या बदल्यात अवंथा ग्रुपला कर्ज मंजूर करण्यात आलं होतं. तसंच इतर अनेक लाभ देण्यात आले होते.

सीबीआयने गेल्या वर्षी राणा कपूर आणि त्यांच्या पत्नीविरोधात बंगल्याच्या माध्यमातून ३०७ कोटींची लाच घेत मोबदल्यात १९०० कोटींचं कर्ज मंजूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.