16 December 2017

News Flash

फास आवळला ! झाकीर नाईकची १८ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

एका प्रकरणात ३० मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली | Updated: March 20, 2017 8:40 PM

Zakir Naik: वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक. (संग्रहित छायाचित्र)

वादग्रस्त मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक विरोधात सोमवारी मोठा निर्णय घेण्यात आला. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) २०० कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इस्लामिक रिसर्च फाऊंडशेन (आयआरएफ) आणि अन्य ठिकाणीची सुमारे १८.३७ कोटी रूपयांची संपत्ती जप्त केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही (एनआयए) झाकीर नाईकविरोधात दुसरी नोटीस जारी केली असून दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत दाखल एका प्रकरणात ३० मार्चपर्यंत न्यायालयासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

यापूर्वी ईडीने झाकीर नाईक आणि आयआरएफशी निगडीत मनी लॉन्ड्रिंगच्या या प्रकरणात त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती. ईडीकडून झाकीर नाईकचा शोधही सुरू आहे. सध्या झाकीर नाईक हा सौदी अरबमध्ये आहे. ईडीने याच महिन्यात झाकीर नाईकची बहिण नइलाह नौशाद नुराणीचीही चौकशी केली होती. नइलाह या झाकीर नाईकच्या कागदोपत्री असलेल्या ५ कंपन्यांची संचालक असल्याचे बोलले जाते. एनआयएनेही नइलाह यांची यापूर्वी चौकशी केली आहे.
या पाचही कंपन्या नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशनसाठी मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहेत. ईडीने आपल्या तपासात झाकीर नाईक आणि त्याच्या एनजीओने सुमारे २०० कोटी रूपयांचे मनी लॉन्ड्रिंग केल्याचे सिद्ध केले आहे. यामध्ये ५० कोटी रूपये नइलाहच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते.
सध्या भारतात परतण्याचे झाकीर नाईकचे कुठलेच संकेत नाहीत. नाईक हा अवैध कामात गुंतला असल्याचे व दहशतवाद्यांशी त्याचा संबंध असल्याचा मुंबई पोलिसांनी यापूर्वीच महाराष्ट्र सरकारला अहवाल दिला आहे. ईडीने यासंबंधी झाकीर नाईकला तीन वेळा समन्स जारी केलेले आहे.
एनआयएने सोमवारी झाकीर नाईकला दुसरी नोटीस जारी केली. दहशतवाद विरोधी कायद्यातंर्गत त्याला ३० मार्च रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. एनआयएने यापूर्वी याच महिन्यात पहिले समन्स जारी केले होते. यामध्ये त्याला १४ मार्च रोजी हजर होण्यास सांगितले होते.
गतवर्षी ढाका येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. नाईकमुळे आपण प्रेरित झाल्याचे या दहशतवाद्यांनी म्हटले होते. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात एनआयएने नाईक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला होता. नाईकवर धर्माच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

First Published on March 20, 2017 8:40 pm

Web Title: ed attaches assets worth rs 18 37 crores of islamic research foundation zakir naik