नवी दिल्ली : गँगस्टर इक्बाल मिर्चीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाच्या संबंधात मिर्चीची ६०० कोटी रुपये बाजारमूल्याची मालमत्ता आपण गोठवली असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सांगितले.

या मालमत्तांमध्ये मुंबईच्या वरळी भागातील सीजय हाऊसचा तिसरा व चौथा मजला, अरुण चेंबर्स, ताडदेव येथील एक कार्यालय, वरळीच्या साहिल बंगल्यातील ३ फ्लॅट्स, क्रॉफर्ड मार्केटमधील ३ मोक्याची व्यावसायिक दुकाने, तसेच लोणावळा येथील बंगले आणि ५ एकरहून अधिक जमीन यांचा समावेश असल्याचे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे. या मालमत्ता मिर्चीने त्याच्या कुटुंबीयांच्या व नातेवाईकांच्या नावे खरेदी केल्या होत्या.

याच प्रकरणात ईडीने अलीकडेच इक्बाल मिर्चीविरुद्ध मुंबईच्या एका विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

हाफिज सईदवर आरोपपत्र

लाहोर : मुंबईतील २००८ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद व त्याच्या तीन साथीदारांवर पाकिस्तानातील दहशतवाद विरोधी न्यायालयाने बुधवारी आरोपपत्र दाखल केले. त्यात दहशतवादास पैसा पुरवल्याच्या आरोपाचा समावेश आहे. हाफिज अब्दुल सलमान, महंमद अशरफ, झफर इक्बाल यांच्यावरही आरोप ठेवले आहेत.