योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली फूड अ‍ॅण्ड हर्बल पार्कमधील कामकाज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी ठप्प झाले होते. पार्कमधील सुरक्षारक्षक आणि ट्रकचालकांच्या स्थानिक संघटनेचे सदस्य यांच्यात बुधवारी रक्तरंजित चकमक झडल्याने अद्यापही तेथे तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे शुक्रवारीही कामकाज ठप्प झाले होते.
जवळपास २३ कोटी रुपये खर्चून ९५ एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या पार्कमध्ये दररोज सरासरी २०० ट्रक भरून मालाची ये-जा केली जाते. मात्र तणावाचे वातावरण असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सुरक्षारक्षक आणि स्थानिक सदस्य यांच्यात झालेल्या चकमकीत एका ट्रकचालकाचा मृत्यू झाल्यानंतर तणाव अधिकच वाढला आहे.
मालाची ने-आण करण्यासाठी आमच्या ट्रकऐवजी हरिद्वारहून ट्रक आणले जातात ही ट्रकचालकांच्या संघटनेची मुख्य तक्रार आहे. मात्र स्थानिक ट्रकचालक एका दिवसाचे १९ हजार रुपये देण्याची मागणी करतात तर बाहेरील ट्रकचालक तेच काम केवळ १० हजार रुपयांच्या मोबदल्यात करतात, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.