जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील आर्थिक गैरव्यवहारातील प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशी केली.

पीएमएलए कायद्यानुसार त्यांचे जाबजबाब घेण्यात येत असून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या गुन्ह्य़ाच्या आधारे सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली. सीबीआयने जेकेसीएचे पदाधिकारी महंमद सलीम खान व अहसान अहमद मिर्झा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने नंतर अब्दुल्ला, खान, मिर्झा, मीर मंझूर गझनफर अली, बशीर अहमद मिसगार व गुलझार अहमद बेग यांच्यावर ४३.६९ कोटींच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल केला. हे पैसे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अनुदानापोटी २००२ ते २०११ या काळात जेकेसीएला दिले होते.