तबलिगी जमात फंडिंग केस प्रखरणात ईडीने दिल्ली, मुंबईसह २० ठिकाणी छापे मारले आहेत. दिल्लीतल्या सात ठिकाणी, मुंबईतल्या पाच ठिकाणी, हैदराबाद येथील चार ठिकाणी आणि केरळमधल्या तीन ठिकाणी छापे मारले आहेत. या सगळ्या ठिकाणांहून तबलिगी जमातशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रं आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं मिळाली आहेत. दिल्लीतल्या ठिकाणांपैकी झाकीर नगर हे मुख्य आहे. या ठिकाणी तबलिगी मरकजचं मुख्यालय आहे याशिवाय कोच्चीच्या तीन ठिकाणी अंकलेश्वरमध्ये छापे मारण्यात आले आहे. मुंबईतल्या अंधेरीसह इतर भागांमध्येही छापे मारण्यात आले आहेत.

करोना संकटात तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमात गर्दी झाली होती. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दिल्ली, मुंबईत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केला होता. मरकजमध्ये हजारो लोक होते. त्यांच्या राहण्यासाठी, खाण्यासाठी कुठून निधी दिला जात होता? मरकजमध्ये भारतातील अनेक राज्यातून आणि परदेशातून मोठ्या संख्येने लोक आले होते. त्याचे प्रायोजक कोण होते? त्यांच्या प्रवासाचा खर्च कोणी केला? याबाबत ईडीचा तपास सुरु आहे.

मार्च महिन्यात मरकज वसईत होणार होता. मात्र या मरकजला पोलिसांनी संमती दिली नाही. त्यानंतर हा मरकज दिल्लीत घेण्यात आला. त्यावेळी करोना संकट असल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे दिल्लीत घेण्यात आलेल्या मरकज प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या मरकजमध्ये परदेशातून आलेले तबलिगीही सहभागी झाले होते. करोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याचा ठपका या समाजावर ठेवण्यात आला. तसंच नियमांचं उल्लंघन आणि करोनाचा फैलाव झाल्याने दिल्लीतील निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्याविरोधात १७ एप्रिल रोजी पैशांच्या अफरातफर प्रकरणीही ईडीने गुन्हा दाखल केला होता. आता या सगळ्या फंडिंग प्रकरणीच ही छापेमारी करण्यात आली आहे.