PNB पंजाब नॅशनल बँकेतील ११,३०० कोटी रुपयांच्या देशातील सर्वांत मोठ्या बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी Nirav Modi Fraud याच्या देशभरातील १७ मालमत्तांवर अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने छापे टाकले आहेत. या कारवाईत मोदीच्या मालकीच्या गितांजली जेम्स या दागिन्यांच्या दुकानांतील ५१०० कोटी रुपयांचे हिरे जडजवाहीर आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोदीच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील ईडीने जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर ईडीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून नीरव मोदी, त्याची पत्नी अमी मोदी आणि मेहुल चोक्सी यांचे पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली आहे.

ईडीने अरबपती आणि हिऱ्याचा व्यापारी असलेल्या नीरव मोदीची कार्यालये, शोरूम्स आणि वर्कशॉप्सवर छापे मारले आहेत. त्याचबरोबर येथे आढळून आलेले रेकॉर्ड्स आणि कागदपत्रे पुढील तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याच्या बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये ३.९ कोटींच्या बचत आणि मुदत ठेवींचा समावेश आहे.

नीरव मोदीच्या मुंबई, सुरत आणि नवी दिल्लीतील कार्यालये, शोरुम्स आणि वर्कशॉप्सवर ईडीने छापे मारले आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड बॉर्समधील फायरस्टार डायमंड प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्यालय, कुर्ला पश्चिममधील कोहिनूर सीटीमधील मोदीचे खासगी कार्यालय, शारुम्स तसेच दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील इट्स हाऊस येथील बुटीक आणि लोअर परळ येथील पेनिंसुला बिझनेस पार्कमधील वर्कशॉपवर ईडीने छापे मारून तेथील मालमत्ता जप्त केली आहे.

त्याचबरोबर सुरतमधील सचिन टाऊन येथील सुरत एसईझेडमधील ६ हिरे घडवणाऱ्या कारखान्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्याचबरोबर येथील हिरे जडजवाहीराचे मोठे केंद्र असणाऱ्या रिंग रोड येथील वेल्जिअम टॉवरमधील एका कार्यालयावर देखील ईडीने छापा टाकला आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीच्या चाणक्यपुरी आणि डिफेन्स कॉलनीतील मोदीच्या दोन हिऱ्यांच्या दुकानांवरही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेला ११, ३०० कोटी रुपयांचा गंडा घालणारा अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदीने देशाबाहेर पलायन केल्याचे वृत्त आहे.  कारवाई होईल हे दिसताच नीरव मोदीने स्वित्झर्लंडमध्ये पळ काढल्याचे समजते. या वृत्ताला अद्याप मुंबई पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.

पंजाब नॅशनल बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी फसवणुकीच्याद्वारे बँकेच्या परदेशस्थ शाखांमधून नीरव मोदी व त्यांच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतली. मात्र, त्याविषयी बँकेच्या यंत्रणेत कोणतीच नोंद झाली नव्हती. या संशयाच्या आधारेच बँकेने कंपन्यांविरोधात पहिली तक्रार दिली होती. शेअर मार्केटला या घोटाळ्याची माहिती देणे बंधनकारक असल्याने बुधवारी बँकेने ही माहिती कळवली आणि या घोटाळ्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली