नवी दिल्ली : गुजरातमधील माजी आयएएस अधिकारी संजय गुप्ता आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या ३६ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मालमत्तेवर आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वेय (पीएमएलए) टाच आणण्यात आली असल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी सांगितले.

भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) १९८५च्या तुकडीचे अधिकारी असलेले गुप्ता यांनी २००२ साली नोकरी सोडली व त्यानंतर ‘नीसा ग्रुप ऑफ कंपनीज’ या नावाने स्वत:चा आदरातिथ्य व्यवसाय सुरू केला.

गुप्ता यांच्याविरुद्ध ईडीचे प्रकरण गुन्हेगारी स्वरूपाची कथित गैरवर्तणूक आणि ‘मेट्रो लिंक एक्स्प्रेस फॉर गांधीनगर अँड अहमदाबाद कंपनी लिमिटेड’ (एमईजीए) साठी केलेल्या निधीच्या अफरातफरीबाबतचे आहे. गुप्ता हे एप्रिल २०११ ते ऑगस्ट २०१३ या काळात एमईजीएचे अध्यक्ष होते.

एमईजीएच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात गुप्ता यांनी, पूर्वी नीसा ग्रुपमध्ये त्यांच्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची मनमानीपणाने विविध कार्यकारी पदांवर नेमणूक केल्याचे तपासात आढळले. गुप्ता यांनी या कर्मचाऱ्यांना संचालक दाखवून केवळ कागदावरील किंवा बनावट (डमी) अशा अनेक कंपन्या स्थापन केल्या आणि २०१२-१३ या काळात त्यांच्या नावे बँक खाती उघडली, असा आरोप ईडीने एका निवेदनात केला आहे. संजय गुप्ता, त्यांची पत्नी नीलू गुप्ता, तसेच नीसा समूहातील कंपन्यांच्या नावाने असलेल्या मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीने हंगामी आदेश जारी केला आहे.