एडिटर्स गील्ड ऑफ इंडियाने शनिवारी आयोजित केलेले एक  वेबिनार अज्ञात व्यक्तींनी उधळून लावले. ‘नक्षलग्रस्त भागातील बातमीदारीची आव्हाने’ या विषयावर हे वेबिनार आयोजित केले होते.

ही घटना धक्कादायक असल्याचे सांगून एडिटर्स गील्ड ऑफ इंडियाने म्हटले आहे,की ‘अनहर्ड व्हॉइसेस- रिपोर्टिग फ्रॉम कॉनफ्लिक्ट झोन’ या विषयावर हे वेबिनार आयोजित केले होते. त्यात अशा  काही नामवंत पत्रकारांचा समावेश होता ज्यांनी नक्षली भागात वार्ताकन केले आहे. वेबिनार सुरू होताच काही मिनिटांतच काही सहभागी व्यक्तींनी भलत्याच गाण्याची चित्रफीत सुरू केली. त्यानंतर बैठकीच्या आयोजकांनी ते बंद केले. प्रत्येक वक्त्यासाठी असलेली चित्रचौकट त्यामुळे बंद झाली. पण तरी काही लोकांनी व्यत्यय आणणे सुरू ठेवले. काहींनी अश्लील संदेश या गटाविषयी पाठवले. पॉनरेग्राफिक आशयही त्यात दाखवला, शिवीगाळीची भाषा वापरण्यात आली. यात एकाही व्यक्तीला बोलण्याची संधी मिळाली नाही, कार्यक्रम बंद करावा लागला.

या घटनेने धक्का बसल्याचे गील्डने म्हटले असून याआधी कधीही अशा प्रकारे कार्यक्रम उधळून लावण्यात आला नव्हता.  ज्यांची कुणाची आमची मते ऐकण्याची तयारी नव्हती त्यांनीच हा कार्यक्रम उधळून लावला आहे. नक्षलग्रस्त भागात काही वेळा मोठय़ा प्रमाणावर अत्याचाराच्या घटना दोन्हीकडून घडत असतात. तेथे मानवी हक्कांचे अनेक दशके उल्लंघन होत आले आहे, असे गील्डचे म्हणणे आहे.

‘हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला..’

हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला असून सायबर गुन्हे शाखेने याचा तपास करावा, अशी मागणी एडिटर्स गील्ड ऑफ इंडिया या संस्थेने केली आहे.