नवी दिल्ली : कोविड विषाणू संसर्ग ज्यांना झाला आहे त्यांच्यात नंतरच्या काळात ‘नागीण’ हा रोग डोके वर काढू शकतो, त्याशिवाय केसांची गळती होऊ शकते. त्याचबरोबर अनेक गुंतागुंतीचे त्वचारोगही निर्माण होऊ शकतात, कारण या लोकांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते.

त्वचारोग तज्ज्ञांनी दिल्ली, मुंबई व इतर शहरातील व्यक्तींचा अभ्यास केला असून ज्या व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे किंवा ज्यांनी गृहविलगीकरण पूर्ण केले आहे त्यांच्यात त्वचेची आग किंवा इतर लक्षणे दिसत असल्यास त्यावर उपचार करून घेण्यास सांगितले आहे.

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे डॉ. डी.एम महाजन यांनी सांगितले,की दिल्लीत कोविड संसर्गानंतर अनेकांना त्वचेचे रोग झाले असून ते रुग्ण बा रुग्ण विभागात तपासणीसाठी येत आहेत. त्यांना म्युकर मायकोसिसची भीती वाटत आहे पण लोकांनी घाबरून जाऊ नये व काळजी घ्यावी. डॉक्टरांशी सल्लामसलत करावी. बरे होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक करोना रुग्णांमध्ये गुंतागुंत वाढली असून अनेकांमध्ये नागीण रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. अर्थात  त्यांचा आरोग्य इतिहास नागीण रोगाशी संबंध असलेला असावा लागतो. त्यामुळे सर्वांना नागीण रोग होतो असे नाही. ज्यांना पूर्वी होऊन गेला असेल त्यांना तो पुन्हा होण्याची शक्यता असते.

नागीणच्या सिंम्प्लेक्स विषाणूमुळे एचएसव्ही १ व एचएसव्ही २ हे नागिणीचे दोन प्रकार होतात.  हर्पीज लाबियालिस हा रोग ओठाच्या ठिकाणी होऊ शकतो, त्यामुळे चट्टे पम्डून आग होते. हर्पीज झोस्टर यात नागिणीचा व्हॅरिसेला झोस्टर विषाणू पुन्हा डोके वर काढतो. त्यामुळेही चट्टे उमटतात शिवाय वेदनाही होतात. एचएसव्ही नागीण प्रकारापेक्षा  हर्पीज झोस्टर हा नागिणीचा प्रकार करोनानंतर जास्त बघायला मिळाला आहे. कँडिडा बुरशीची लागण बरे होत असलेल्या रुग्णांना होऊ शकते. अति औषधांमुळे ती होते व स्टेरॉइड्स हे त्याचे कारण असते. जननेंद्रियांच्या ठिकाणीही काही वेळा चट्टे उमटलेलेले दिसतात. कँडिडायसिस हा बुरशीजन्य रोग  होतो.

मुंबई येथील त्वचारोगतज्ज्ञ सोनाली कोहली यांनी सांगितले, की करोनामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे त्वचा, केस व नखे यावर परिणाम होतो. याचा वैद्यकीय अभ्यास अजून करण्यात आलेला नसला तरी बरे होत असलेल्या रुग्णांमध्ये केस गळणे, नखांचे रोग दिसून आले आहेत. नखावर तपकिरी पांढऱ्या रेघांचा मेलानोशिया रोग होऊ शकतो.

यामुळे होऊ शकतो. कोहली या मुंबईच्या एच.एन रिलायन्स फाउंडेशनमध्ये त्वचारोगतज्ज्ञ आहेत.

दिल्ली येथे करोनातून बरे होत असलेल्या निकिती कुमार हिने सांगितले की, बरे होण्याच्या काळात केस गळतात. त्यामुळे त्वचारोगतज्ज्ञांकडे गेले असता त्यांनी औषध दिल्यानंतर हे प्रमाण कमी झाले.

केसगळतीची समस्या

वसंत कुंज येथील फोर्टिस रुग्णालयाच्या त्वचारोगतज्ज्ञ डॉ. निधी रोहतगी यांनी सांगितले की, महिलांमध्ये केस गळण्याचे प्रमाण जास्त असते. काही वेळा त्वचेची आग होते, तर काही वेळा संसर्ग होऊन पिटारियासिस रोझा हा रोग होतो. त्यात त्वचेच्या काही भागात पट्टे दिसून येतात. ‘कोविड टोज’ नावाचा रोगही दिसून येतो, त्यात अल्सर किंवा नेक्रॉसिस हा अंगठय़ाच्या टोकाच्या ठिकाणी किंवा शेजारी होतो.