अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. दाऊद सध्या पाकिस्तानमध्ये असून गृहमंत्र्यांच्या विधानाने पुन्हा दाऊदच्या भारतवापसीची चर्चा रंगली आहे.

मुंबई बॉम्बस्फोटांसह विविध गुन्हेगारी कारवायांप्रकरणी वाँटेड असलेला दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. दाऊद नेमका कुठे आहे याविषयी अधिकृत माहिती नाही. मात्र दाऊदला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा कवच दिल्याचे समोर आले आहे. दाऊदला पुन्हा भारतात परत आणण्याचा दावा वेळोवेळी केला जातो. मात्र अद्याप यात यश आलेले नाही. आता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा दाऊदच्या भारतवापसीचे विधान केले आहे. यापूर्वी गोपीनाथ मुंडे यांनीही दाऊदवर प्रतिक्रिया दिली होती. मुसक्या बांधून दाऊदला देशात आणण्याची गोपीनाथ मुंडे यांची घोषणा १९९५च्या दरम्यान फार गाजली होती.

दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषदेत राजनाथ सिंह यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. सुप्रीम कोर्टाने धर्म, जातीच्या आधारे मत मागता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. याविषयी राजनाथ सिंह म्हणाले, आपण धर्माविषयी चर्चा करु शकतो. जबाबदारीची जाणीव असणे हादेखील धर्मच आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. राजकारण हे नेहमीच विकासावर झाले पाहिजे असे सिंह यांनी सांगितले. भाजप जात आणि धर्माच्या आधारे मताचे ध्रूवीकरण करत नाही. कथित धर्मनिरपेक्षवादी पक्षांनी नेहमीच भाजपची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला. मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांच्यातील वादावरही राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. पितापुत्रांमध्ये वाद ही नेहमीच वाईट गोष्ट असते असे ते म्हणालेत.