इजिप्तमध्ये कैरोतील दक्षिण भागामधल्या कॉप्टिक चर्चवर झालेल्या हल्ल्यामध्ये १० जण दगावले आहेत. माथेफिरू बंदुकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केला ज्यामध्ये चर्चबाहेर असलेले लोक बळी पडले. माथेफिरू बंदुकधाऱ्याच्या गोळीबाराला सुरक्षारक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आणि शेवटी त्या बंदुकधाऱ्याने शेवटी स्वत:ला गोळी झाडून घेतली व आत्महत्या केली. इजिप्तच्या गृहमंत्र्यांनी या दुर्घटनेमध्ये १० जण ठार झाल्याचे सांगितले.

इजिप्तच्या मेना या सरकारी वृत्तसंस्थेने सरकारी अधिकाऱ्यांचा दाखला देत हा हल्ला दोन हल्लेखोरांनी घडवून आणल्याचे सांगितले. एक हल्लेखोर पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे, तर एक जण घटनास्थळी ठाार झाला. पळून गेलेल्या हल्लेखोराचा सुरक्षा रक्षक कसून तपास करत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी मेनाला सांगितल्याचे वृत्त आहे.

चर्चच्या भोवतीचा संपूर्ण परीसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. या हल्ल्याची अद्याप कुणी जबाबदारी घेतली नसली तरी इजिप्तमधील कॉप्टिक चर्चच्या ख्रिश्चन समुदायाला गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक हल्ल्यांना तोंड द्यावे लागले आहे.

याआधी डिसेंबर ११ रोजी इजिप्तमधील अल्पसंख्य असलेल्या या समुदायावर असा हल्ला करण्यात आला होती. कॉप्टिक ख्रिश्चन हा इजिप्तमधला शेकडो वर्षांचा इतिहास असलेला समाज आहे. डिसेंबर ११ रोजी इजिप्तमधल्या मुख्य ख्रिश्चन कॅथेड्रलवर बाँबहल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये २२ जण ठार झाले होते, तर ३५ जण जखमी झाले होते.