इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोरसी आणि पोलीस यांच्यात गेल्या आठवडय़ापासून उसळलेल्या चकमकीनंतर दंगलखोरांनी येथील सुप्रसिद्ध मलावी राष्ट्रीय पुराणवस्तुसंग्रहालयाची मोडतोड करून ते लुटल्याची घटना घडली आहे.
इजिप्तच्या मिन्या शहरात हे पुराणवस्तुसंग्रहालय असून ते फोडण्यात आले आणि त्यामधील काही वस्तूंची नासधूस करण्यात आली, त्याचप्रमाणे काही वस्तू चोरण्यात आल्या.
मोहम्मद मोरसी यांच्या समर्थकांनी पुराणवस्तुसंग्रहालयाच्या बगिच्यामध्ये धरणे धरले आणि त्यानंतर इमारतीच्या आतमधील फाटकाचा ताबा घेऊन ते मुख्य भागात घुसले. टेहळणी कॅमेऱ्यांच्या मोडतोड करून निदर्शकांनी काही वस्तू चोरल्या.
ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे, त्यामुळे देशाच्या संपत्तीचे अतोनात नुकसान झाले आहे, असे राज्यमंत्री मोहम्मद इब्राहिम यांनी म्हटले आहे. पुरातत्त्व विभागाशी संबंधित समिती या वस्तुसंग्रहालयाची तपासणी करीत असून हरवलेल्या वस्तूंची यादी ते लवकरच सादर करणार आहेत, असेही ते म्हणाले. चोरण्यात आलेल्या वस्तूंची तस्करी होऊ नये यासाठी वस्तूंची यादी सर्व बंदरांमध्ये देण्यात येणार आहे, असेही इब्राहिम म्हणाले.