इजिप्तच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी तेथील लष्करस्थापित सरकारने सामूहिक राजीनामे दिले असून संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख अब्देल फताह अल-सिसी यांच्याकडे देशाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सिसी यांना पायउतार होणे शक्य व्हावे यासाठी थोडय़ा प्रमाणात सरकारची पुनर्रचना करण्यात येणार असून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी अपेक्षा आहे. मात्र पंतप्रधान हाझेम अल-बेबलावी यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक राजीनामे देण्यात आल्याने मंत्रिमंडळातील काही जण अद्याप आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांना लष्कराने पायउतार केल्यानंतर गेल्या जुलै महिन्यात स्थापन झालेल्या बेबलावी सरकारवर, ढासळती अर्थव्यवस्था, दहशतवादी हल्ले आणि कामगारांच्या संपामुळे सातत्याने दबाव येत होता.
सिसी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यता असून सरकारने सामूहिक राजीनामे दिल्याने नवे मंत्रिमंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे. सिसी हे सध्या देशातील शक्तिशाली राजकीय नेते म्हणून उदयास येत आहेत. त्यांनी आपली उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नसली तरी त्यांचे सहकारी मात्र ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असा दावा करीत आहेत.
इजिप्तचा दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांत कसूर केली नाही, असे मावळते पंतप्रधान बेबलावी यांनी म्हटले आहे. वैयक्तिक हिताच्या गोष्टींना प्राधान्य देण्याची ही वेळ नाही तर देशहिताला प्राधान्य देण्याची वेळ आहे, असे ते म्हणाले.