इजिप्तमध्ये हिंसाचार पसरवल्या प्रकरणी मुस्लीम ब्रदरहूडचे नेते महंमद बाडी व इतर १४ सदस्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी मालकीच्या नाइल टीव्हीने हे वृत्त दिले आहे. फौजदारी न्यायालयाने एकूण १५ जणांना फाशी तर इतर ३६ जणांना सरकारी आस्थापनांवर हल्ले केल्याच्या प्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना या निकालावर अपील करता येणार आहे.
ते सर्व लोकशाही मार्गाने निवडून आलेले माजी अध्यक्ष मोहंमद मोर्सी यांचे समर्थक होते. २०१३च्या लष्करी बंडात इजिप्तमधील लोकांमध्ये मोठी फूट पडली होती. त्या वेळी मोर्सी सत्तेवर आले होते. त्या धामधुमीत मोर्सी यांच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणात हिंसाचार केला व शेकडो लोकांचे जीव घेतले. मोर्सी समर्थकांनी त्या वेळी पोलीस स्टेशन, सुरक्षा दले व निदर्शकांवरही हल्ले केले होते. बाडी यांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला होता. त्यांना मृत्युदंडाबरोबरच २०१३च्या बंडाच्या वेळी केलेल्या हिंसाचारात आजन्म कारावासाचीही शिक्षा देण्यात आली आहे. बंडानंतर नवीन सरकारने मुस्लीम ब्रदरहूडला बेकायदा ठरवले. मोर्सी यांनाही अटक करण्यात आली. त्या सर्वावर खटले भरण्यात आले.
न्यायालयाने महंमद सुलतान यालाही आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बाडी यांना मार्चमध्येच दोषी ठरवण्यात आले होते. आज त्यावर श्किामोर्तब करण्यात आले आहे.