इजिप्तमध्ये दोन भीषण अपघातांमध्ये एकूण २८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक पर्यटकांचा समावेश असून त्यात एक भारतीय पर्यटकाचाही समावेश असल्याचं समजतंय. याशिवाय १६ भारतीय पर्यटक जखमीही झालेत. सूझ शहरातील हॉस्पिटलमध्ये या पर्यटकांवर उपचार करण्यात येत असून भारतीय दूतावासाचे अधिकारी तेथे उपस्थित आहेत. सूझ शहर आणि कैरो येथील दोन संपर्क क्रमांकही जारी करण्यात आले आहेत. इजिप्तमध्ये पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला असून त्यामध्ये १६ भारतीय पर्यटक जखमी झाल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले आहे.

स्थानिक माध्यमांनुसार, दोन वेगवेगळ्या अपघातांत जवळपास २८ जण ठार झाले असून यामध्ये एका भारतीयाचा समावेश आहे. पहिल्या अपघातात टेक्सटाईल कामगारांना घेऊन जाणारी बस एका कारवर आदळली. यामध्ये सहा जण ठार झाले. तर, दुसऱ्या अपघातात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या दोन बस समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळल्या. यामध्ये २२ जण ठार झाले. यामध्ये एका भारतीय पर्यटकाचाही समावेश आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. तर १६ भारतीयांसह २४ जण जखमी झाल्याचे भारतीय दूतावासाने सांगितले आहे. अद्याप मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयाबाबत कोणतीही माहिती दूतावासाने दिलेली नाही.