इजिप्तचे पदच्युत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात बुधवारी उसळलेल्या रक्तरंजित संघर्षांतील बळींनी पाचशेचा आकडा ओलांडला आहे. या संघर्षांत ५२५ जण मृत्युमुखी तर ३ हजार ७१७ जण जखमी झाल्याची माहिती इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ता खलीद-अल-खातीब यांनी दिली.
मोर्सी यांना पदच्युत केल्याने त्यांचे समर्थक व मुस्लीम ब्रदरहूडचे कार्यकर्ते यांनी बेबलावी यांच्याविरोधात अघोषित युद्ध छेडले होते. बेबलावी विरोधाची ही धार कायम राहण्यासाठी या हजारो समर्थकांनी कैरोजवळच्या नस्र या उपनगरात काही छावण्या उभारल्या होत्या. या छावण्या गुंडाळून निघून जाण्याची पोलिसांची व लष्कराची सूचना या समर्थकांनी वारंवार दुर्लक्षिल्याने बेबलावी सरकारने बुधवारी टोकाचे पाऊल उचलले. बंडखोरांच्या या छावण्या उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला तसेच त्यावरून बुलडोझरही फिरवले. पोलिसी बळापुढे निष्प्रभ ठरलेले बंडखोर मोठय़ा प्रमाणावर मारले गेले. दरम्यान, या हत्याकांडात किमान दोन हजार आंदोलक ठार झाल्याचा दावा मुस्लीम ब्रदरहूडने केला आहे.

समर्थकच जबाबदार
या कारवाईसाठी मोर्सी यांचे समर्थकच जबाबदार आहेत, असा आरोप बेबलावी यांनी केला. पोलीस ठाणे, रुग्णालये यांच्यावर हे आंदोलक हल्ले करत होते, वारंवार शांततेचे आवाहन करूनही त्यांच्या हिंसक कारवाया सुरूच होत्या. आम्हाला इजिप्तमध्ये लष्कराचे तसेच धर्मवेडे सरकार नको असून लोकशाहीवादी सरकार हवे आहे, त्यासाठी ही कारवाई आवश्यक होती, असे सांगत बेबलावी यांनी या घटनेबद्दल माफी मागण्याचे टाळले.