इसिस दहशतवाद्यांनी ११ जुलै रोजी इजिप्तमधील इटालियन दूतावासात केलेल्या बॉम्बहल्ल्यानंतर इजिप्त लष्कराने इसिसविरुद्धची मोहीम तीव्र केली असून ८८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात इजिप्तचे जवान यशस्वी ठरले आहेत.
इजिप्त लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल मोहम्मद समीर म्हणाले की, जवानांनी २० ते ३१ जुलैदरम्यान केलेल्या कारवाईत उत्तर सैनी प्रांतात हे एकूण ८८ दहशतवादी ठार करण्यात आले. इटालियन दूतावासावर बॉम्बहल्ला केल्याचा इसिसवर आरोप ठेवण्यात आला आहे. इजिप्तमधील दूतावासाला कट्टरपंथीयांकडून प्रथमच लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते.
मोहम्मद समीर म्हणाले की, दूतावासावरील हल्ल्याप्रकरणी ५६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यासाठी ४० वाहने आणि ३६ विनापरवाना दुचाकी वापरण्यात आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आल्यावर जानेवारी २०११ पासून दहशतवाद्यांनी उत्तर सैनी प्रांतात सातत्याने हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्करावर सातत्याने हल्ले केले आहेत. आतापर्यंत ६०० सैनिकांची हत्या करण्यात आली आहे.
४१ जणांवर दहशतवादी कृत्यांचा आरोप
संयुक्त अरब अमिरातमधील आघाडीच्या विधितज्ज्ञाने दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून ४१ जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. प्रॉसिक्युटर जनरल सलीम सईद कुबेश यांनी याचिकेत म्हटले आहे की, हा गट दहशतवादी कारवाया करण्याच्या प्रयत्नात होता. तसेच त्यांची कृती इसिसप्रमाणे दहशतवादी हल्ल्याची होती. दुबई, अबुधाबी ही दहशतवादी कारवायांपासून दूर असलेली शहरे आहेत.