इजिप्तमधील एका व्यक्तीने आपल्याच भावाचा खून केल्याची कबुली दिली आहे. बकरी ईदनिमित्त बकऱ्याचा बळी दिल्यानंतर मटण वाटपावरुन झालेल्या वादावरुन हे भांडण झालं. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मटण वाटपावरुन झालेल्या वादातून आरोपीने त्याच्या भावाला चाकूने भोसकले आणि बहिणीवर चाकू हल्ला करुन जखमी केले. यासंदर्भातील वृत्त ‘गल्फ न्यूज’ने दिलं आहे. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.
बेहीराई येथील डेल्टा प्रांतामध्ये ईदच्या कुर्बानीवरुन भावंडांमध्ये वाद झाला. गरिबांना देण्यात येणारे मांस स्वीकारण्यावरुन दोन भावांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद वाढला आणि हे दोघे हणामारी करु लागले असं येथील स्थानिक वृत्तपत्र असणाऱ्या ‘एल मासरी अल युऊम’ने दिलं आहे. हे मांस आपण घेऊ नये असं एका भावाचं म्हणणं होतं तर इतर दोन भावंडांचा याला विरोध होता. मांस घेण्यावरुन झालेल्या वादातून विरोध करणाऱ्या भावाने कुटुंबाने स्वीकारलेलं मांस खिडकी बाहेर फेकलं. यावरुन दोन्ही भावांमध्ये वाद सुरु झाला. या वादामध्येच रागात मटण खिडकीबाहेर फेकणाऱ्या भावाने चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याने बहिणीच्या पोटामध्ये चाकू भोसकला. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीला कोर्टासमोर सादर करण्यात आले असता त्याचा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ईददरम्यान ज्या मुस्लिमांना कुर्बानीसाठी प्राण्यांचा बळी देता येत नाही त्यांना कुर्बानी देणाऱ्याकडून मांस दान म्हणून दिले जाते. रमजान ईदनंतर बरोबर ७० दिवसांनी येणारा बकरी ईद हा दिवस मुस्लिम धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. रमजान ईदनंतरचा मोठा सण म्हणून हा दिवस ओळखला जातो. मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांसाठी बकरा कापणे अनिवार्य आहे. यातही हा कापलेला बकरा केवळ आपल्या कुटुंबात वाटून न खाता तो समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी गरिबांची विशेष काळजी घेतली जाते. बळी दिलेल्या बकऱ्याचा मांसाचे तीन भाग केले जातात. त्यामध्ये गरिब, गरजवंत आणि स्वत: असे हे मांस वाटले जाते. देवाचा आदेश मानून हा बळी दिला जातो आणि कुटुंबिय एकत्रितपणे त्याचे मांस खातात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 12:49 pm