इजिप्तच्या लष्करी जवानांना सुट्टीसाठी निवासस्थानाकडे घेऊन जाणा-या बसवर करण्यात आलेल्या आत्मघाती हल्ल्यात १० जवान ठार झाले तर अन्य ३५ जण जखमी झाले आहेत.  उत्तर सिनाई प्रांतात बुधवारी सकाळी स्फोटके लादून आणलेली कार आत्मघाती हल्लेखोरांनी या बसला धडकवून स्फोट घडवून आणला, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली़.
रफाहपासून उत्तर सिनाई प्रांताची राजधानी असलेल्या अल्-अरिश भागाकडे जाणाऱ्या मार्गावर हा हल्ला करण्यात आला.  या भागातच इजिप्तचे सुरक्षा दल इस्लामी अतिरेक्यांशी लढत आहे.  इस्लामी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी पदच्युत झाल्यापासूनचा लष्करावरचा हा सर्वात भीषण हल्ला असल्याचे बोलले जात आहे.  हल्ल्यातील मृतांमध्ये सहा जवान, तीन सुरक्षा अधिकारी आणि वाहन चालक यांचा समावेश आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले.
अद्याप कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली, तरीही हल्ल्याच्या पद्धतीवरून हल्ला अल्-कायदाने केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े.