इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर तेथील सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अदली मनसोर यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याचे इजिप्तमधील राष्ट्रीय वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. पुढील अध्यक्ष निवडेपर्यंत मनसोर या पदावर कायम राहतील, असे लष्कराने स्पष्ट केले. इजिप्तची नवी राज्यघटना फेटाळून लावत लवकरच नव्याने निवडणुका घेण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले.
मोर्सी यांच्या राजीनाम्याच्या मागणीने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता. मात्र, त्यांनी राजीनाम्यास ठाम नकार दिला होता. मुक्त आणि मोकळ्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने आपण निवडून आलो असल्याचे मोर्सी यांनी स्पष्ट केले होते. गेल्या वर्षभरापासून ते अध्यक्षपदावर कार्यरत होते. लष्करप्रमुखांनी मोर्सी यांची हकालपट्टी केल्याचे दूरचित्रवाहिन्यांवरून जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधकांनी संपूर्ण इजिप्तमध्ये जल्लोष केला. कैरोतील ताहरीर चौकामध्ये आतषबाजीही करण्यात आली. मोर्सींच्या पाठिराख्यांनी केलेल्या विरोधामुळे काही ठिकाणी चकमक उडाली. मोर्सी समर्थक आणि विरोधक परस्परांना भिडल्यामुळे नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या हिंसाचारानंतर संपूर्ण देशात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीये.