इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद मोर्सी  यांनी सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या प्रकारावरून देशातील तणाव प्रचंड वाढला आहे. निदर्शकांना पांगविण्यासाठी दंगलविरोधी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडण्याची केलेली कृती हा अभूतपूर्व हल्ला असल्याची जळजळीत टीका इजिप्तच्या न्यायव्यवस्थेने केली आहे.
मोर्सी  यांच्या कृतीवर इजिप्तच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेने टीका केली असून राष्ट्राध्यक्षांचे निर्णय आता न्यायव्यवस्थेला दुर्लक्षित करण्यास सरावले असल्याचे म्हटले आहे. नव्या घटनेची घोषणा हा न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावरील आणि त्यांच्या निर्णयावर घातलेला घाला असल्याचे सर्वोच्च न्याय परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे.
इजिप्तच्या तहरीर चौकात विरोधी पक्षाच्या निदर्शकांनी जवळपास ३० तंबू ठोकले आणि तेथेच रात्र घालविली. मात्र निदर्शकांची संख्या वाढू लागताच त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी शनिवारी सकाळी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.
इजिप्तचे माजी अध्यक्ष मोबारक यांचे सरकार उलथून टाकण्यासाठी इजिप्तमधील जनता रस्त्यावर उतरली होती. आता पुन्हा मोर्सी यांची राजवट उलथून टाकण्यासाठी क्रांती घडविण्याचे आवाहन करण्यासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. देशाच्या नव्या घटनेला येत्या सहा महिन्यांत अंतिम स्वरूप देण्यात येणार असून तोपर्यंत न्यायालये अध्यक्षांनी जारी केलेला फतवा अथवा कायदा रद्द करू शकत नाही, असेही  मोर्सी यांनी घोषित केले आहे.
तहरीर चौकात तंबू ठोकण्यात आले असून निदर्शक आणि पोलीस यांच्यात चकमकी उडत आहेत. आपल्याच हातात अधिक अधिकार ठेवण्याच्या मोर्सी  यांच्या प्रयत्नांबाबत अमेरिकेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.