मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद या उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. निमित्त बकरी ईदचे असल्यामुयळे बकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. देशातील बऱ्याच बाजारांमध्ये बकऱ्यांच्या दरांतही लक्षणीय वाढ झाली आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा बकऱ्यांचे दर चार पटीने वाढले असल्याची माहिती सूत्रींनी दिली आहे. बकऱ्यांच्या वाढलेल्या दरांमुळे मांसविक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही मांसाचे दर वाढविले आहेत. सहसा बकऱ्याच्या मांसाचे दर ४०० ते ५०० रुपयांच्या घरात असतात पण बकरी ईदच्या निमित्ताने हे दर प्रति किलोमागे १००० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दरांमध्ये झालेली ही वाढ देशभरामध्ये पाहण्यास मिळत आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश यांसारख्या इतर ठिकाणी बाजारांमध्ये एका बकऱ्यासाठी ६५,००० ते ७५,००० रुपये आकारले जात आहेत.
काही ठिकाणी वाढणारे दर लक्षात घेता चक्क बकऱ्यांचेही ‘अॅडव्हान्स बुकिंग’ करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ग्राहकांकडून बकऱ्याचे आरोग्य, उंची, रंग आणि सौंदर्य या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले जात असल्याची माहिती काही विक्रेत्यांनी दिली आहे. त्यामुळे इतके पैसे खर्ची घालत ग्राहक त्यांच्या चौकस नजरेने पडताळणी केल्यानंतरच योग्य त्या बकऱ्याची निवड करतात. विविध मशिदींमध्ये नमाज अदा केल्यानंतर या उत्सवाची रंगत आणखीनच वाढणार आहे. नमाजनंतर बकऱ्यांना हलाल करत पारंपारिक पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. बकऱ्याची कुर्बानी दिल्यानंतर त्यातील एक भाग स्वत:साठी, दुसरा भाग आप्तेष्टांना आणि तिसरा भाग गरीबांना वाटण्यात येतो. या उत्सवाची पाळेमुळे जरी मुस्लिम धर्माशी एकसंध असली तरीही विविधधर्मीय जनसमुदायही बकरी ईदच्या उत्सवात सहभागी होतो. त्यामुळे खिशाला थोडासा चटका देत यंदाही बकरी ईद उत्साहात साजरा होताना दिसत आहे.