दहशतवादी घुसल्याच्या भीतीने पर्यटकांसाठी काही काळ बंद
पाठीवर मोठय़ा बॅगा घेतलेले तीन ‘संशयित दहशतवादी’ आयफेल टॉवरवर चढताना दिसून आल्यामुळे पर्यटकांचे फ्रान्समधील सर्वात मोठे आकर्षण असलेला हा टॉवर रविवारी सर्व पर्यटकांसाठी बंद करण्यात आला, मात्र नंतर या तिघांचा मागमूस लागला नाही.
सावधगिरीचा इशारा मिळाल्यानंतर दहशतवादविरोधी पोलिसांनी आयफेल टॉवरचा परिसर रिकामा केला. मात्र बराच वेळ शोध घेऊनही तिघे न दिसल्यामुळे ते पॅराशूटच्या साहाय्याने निघून गेल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यामुळे हे लोक खेळाडू असावेत असा कयास बांधला जात आहे.
सकाळी साडेपाचच्या सुमारास तीन लोक बाहेरच्या बाजूने आयफेल टॉवरवर चढत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यांच्या पाठीवर मोठय़ा बॅगा असल्याचे कळल्यामुळे कुठलाही धोका पत्करणे पोलिसांना शक्य नव्हते. तथापि ते पूर्णपणे अदृश्य झाल्यामुळे हे लोक पॅराशूटिंगचे कसबी खेळाडू असावेत की काय, याची चौकशी सुरू आहे. असे असले तरी, त्यांनी निघून जाण्यापूर्वी टॉवरवर धोकादायक साहित्य ठेवले असल्याचीही भीती आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. काही काळानंतर पुन्हा तो खुला करण्यात आला.
दररोज ३० हजार लोक भेट देत असलेला आयफेल टॉवर यापूर्वी इस्लामिक दहशतवाद्यांच्या कटाचे लक्ष्य राहिलेला आहे. या घटनेमुळे लाखोंचा महसूल बुडाला आहे.