येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत एका अल्पवयीन मुलीवर एका विद्यार्थ्यांने बलात्कार केला असून त्यावेळी इतर आठ जण उपस्थित होते. या सर्वानी तिला ब्लॅकमेल केले आहे. वसतिगृहात तिच्यावर बलात्कार करण्यात आला असून सर्व आठ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.

झाशीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार पी यांनी सांगितले की, मुलीने तक्रार दाखल केली आहे. सर्व आरोपींना सोमवारी रात्री अटक केली असून भादंवि व पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हाधिकारी ए. वामसी यांनी मंगळवारी या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढण्याचे आदेश जारी केले. आरोपाविना बारा महिने तुरुंगात ठेवण्यासाठी रासुकाचा वापर या मुलांविरुद्ध केला जाऊ शकतो,  पण त्यासाठी त्यांच्यापासून राष्ट्रीय सुरक्षा व कायदा व सुव्यवस्थेला धोका आहे हे स्पष्ट करावे लागेल.

सरकार गुन्ह्य़ांकडे जातीय, वांशिक दृष्टिकोनातून पाहात नाही: गृह राज्यमंत्री रेड्डी

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार कुठल्याही गुन्ह्य़ांकडे जातीय, वांशिक, प्रादेशिक दृष्टिकोनातून पाहात नाही, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी मंगळवारी व्यक्त केले. रेड्डी यांनी सांगितले की, सरकार महिला, तळागाळातील लोकांविरोधातील गुन्हे सहन करणार नाही. सर्व पीडितांना लवकर व निर्णायक न्याय मिळावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.  फिंगरप्रिंट ब्यूरो संचालकांच्या २०२० मधील अखिल भारतीय परिषदेत रेड्डी यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था हा राज्यसूचीतील विषय असून केंद्र सरकार त्यावर देखरेख करील. पोलीस दलांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे असून राज्य सरकारांना पोलीस निगराणी सुधारण्यासाठी केंद्र सरकार मदत करील.